चिपळूण : चिपळूण येथे १ डिसेंबर रोजी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत प्लास्टिक कचरा मुक्तीच्या संदेशाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध वयोगटांच्या धावण्याच्या शर्यती घेण्यात आल्या. यातील १६ वर्षांखालील मुलांच्या गटातील ५ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत दापोली तालुक्यातील करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी साईप्रसाद उत्पल वराडकर याने बाजी मारली. राजे स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून तो प्रशिक्षण घेत असतो.
साईप्रसादने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवत अव्वल स्थानी धाव पूर्ण केली. त्यामुळे त्याला या गटात प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक मिळाले. स्पर्धेत रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, दापोली आदी भागांतून मोठ्या संख्येने धावपटू सहभागी झाले होते. त्यातूनही साईप्रसादने आपली चमक दाखवली.
हा विजय केवळ वैयक्तिक यश नसून दापोली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे. साईप्रसाद गेल्या काही वर्षांपासून नियमित धावण्याचा सराव करतो आणि स्थानिक तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यापूर्वीही बक्षिसे मिळवली आहे. प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेतील यशामुळे पर्यावरण जागृतीबरोबरच क्रीडा क्षेत्रातही त्याचे नाव ठळकपणे समोर आले आहे.
शाळेत परतल्यानंतर साईप्रसादचे चेअरमन सुजय मेहता आणि मुख्याध्यापिका रितू मेहता यांनी स्वागत केले. त्यांनी साईप्रसादची पाठ थोपटली आणि पुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावरही अशीच कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही जल्लोष करत त्याचे कौतुक केले.
साईप्रसादच्या या यशाने दापोलीतील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील स्पर्धांमध्येही तो अशीच झळाली दाखवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

