मुंबई : महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेल्या अत्यंत लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत होती.
राज्यात गेल्या काही दिवसांत आलेल्या पूरस्थिती, अतिवृष्टीसह अन्य नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र लाभार्थी महिलांना वेळेत e-KYC पूर्ण करता आले नव्हते. या सर्व बाबींची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
विशेष सूचना :
- ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांनी स्वतःचे e-KYC करावे.
- त्याचबरोबर पती/वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र/न्यायालयाचा आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी.
या मुदतवाढीमुळे योजनेच्या लाभाचे सातत्य कायम राहील आणि अधिकाधिक पात्र महिलांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. अद्याप e-KYC न केलेल्या सर्व लाडक्या बहिणींनी या संधीचा लाभ घेऊन तात्काळ प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

