रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. आज पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.
हे इंटरसेप्टर वाहन वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर, सीट बेल्ट न लावणाऱ्यांवर (चारचाकी वाहने), चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर तसेच जड वाहनांच्या नियमभंगावर स्वयंचलित पद्धतीने दंडात्मक कारवाई करणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या स्वयंचलित राहील.

वाहन जिल्हाभर कार्यरत राहणार असून, विशेषतः राज्य महामार्गावरील वाहतूक नियमांचे पालन होईल याकडे लक्ष केंद्रित केले जाईल. महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता आणि प्रभावी अंमलबजावणी या वाहनाच्या माध्यमातून साध्य होणार आहे.
लोकार्पण सोहळ्याला उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्य) राधिका फडके, पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे विवेक पाटील, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा नितीन भोयर, मोटार परिवहन विभागाचे अधिकारी आणि वाहतूक शाखेतील सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते.
नागरिकांना आवाहन: रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गांवर बेफिकीरपणे वेगमर्यादा ओलांडणाऱ्या चालकांना हा स्पष्ट इशारा आहे. वाहतूक नियमांचे पालन करा, निर्धारित वेगात वाहन चालवा आणि अपघात तसेच कायदेशीर कारवाई टाळा.

