रत्नागिरी : गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील जहाजबांधणी कंपनीने रत्नागिरीतील सामाजिक विकासासाठी ₹२५ लाखांचा CSR निधी मंजूर केला आहे. कंपनीचे स्वतंत्र संचालक ॲड. दीपक पटवर्धन यांनी ही माहिती दिली.
सप्टेंबर १९६७ मध्ये स्थापन झालेल्या GSL ने गेल्या ६० वर्षांत ४०० पेक्षा अधिक जहाजांची निर्मिती केली आहे. यात भारतीय नौदलासाठी ८२, सीमा सुरक्षा दलासाठी ३४, निर्यातीसाठी ४८ आणि इतर ग्राहकांसाठी २३९ जहाजांचा समावेश आहे. फ्रिगेट, पॉल्युशन कंट्रोल व्हेसल, फास्ट पेट्रोल व्हेसल्स आदी विविध प्रकारची जहाजे कंपनीने तयार केली आहेत.
कंपनी कायद्यानुसार दरवर्षी नफ्याच्या प्रमाणात CSR खर्च करते. यंदा रत्नागिरी शहरातील जयस्तंभाजवळील उद्यानाच्या सुशोभीकरण, आसनव्यवस्था आणि खेळण्यांसाठी ₹१० लाख, जाकादेवी येथील विद्यालयासाठी ५ स्मार्ट पॅनल बोर्डसाठी ₹१० लाख आणि रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ऑटो रिफ्रेक्टोमीटरसाठी ₹५ लाख मंजूर करण्यात आले आहेत.
२०२१ पासून केंद्र शासनाच्या नियुक्तीनुसार ॲड. पटवर्धन GSL चे स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत. कंपनीचे उत्पादन मूल्य २०२१-२२ मधील ₹७०४ कोटींवरून २०२४-२५ मध्ये ₹२,८०१ कोटींवर, नेट वर्थ ₹१,०९८ कोटींवरून ₹१,६२० कोटींवर, तर निव्वळ नफा ₹१०१ कोटींवरून ₹२८८ कोटींवर पोहोचला आहे. ऑर्डर बुक पोजिशन ₹१६,१९३ कोटींवर आहे.
“संरक्षण क्षेत्रातील ही महत्त्वाची कंपनी असून संचालक मंडळात काम करण्याचा अनुभव मौलिक आहे,” असे ॲड. पटवर्धन म्हणाले.

