दापोली: तालुक्यातील हर्णे परिसरात उसन्या पैशाच्या वादातून एका व्यापाऱ्याला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाजपंढरी येथे घडली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
हर्णे येथील जुनी ब्राम्हणआळी येथील रहिवासी आणि व्यापारी दिपक अशोक खेडेकर (वय ५०) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास ते पाजपंढरी येथील आरोपी भरत चुनेकर (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या घरी गेले होते. खेडेकर यांनी चुनेकर याच्याकडे पूर्वी उसने दिलेले पैसे परत मागितले. याचा राग आल्याने चुनेकर याने खेडेकर यांना अश्लील शिवीगाळ केली. “xxx, येथून चालू पड” असे बोलून त्याने दमदाटी केली आणि घरातून काठी उचलून खेडेकर यांच्यावर हल्ला केला. आरोपीने काठीने खेडेकर यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर आणि डाव्या मांडीवर जोरदार प्रहार केले, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतर खेडेकर यांनी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १२:५६ वाजता दापोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. दापोली पोलिसांनी गु.आर. क्र. १९०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत आरोपी भरत चुनेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.


