दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाळसुरे येथील विद्यार्थिनी शाल्मली माने हिने 17 वर्षीय वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला.

तिने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी करत विजय मिळवला आणि आता विभागस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली आहे.

शाल्मलीने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतही तिने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत विभागस्तरीय स्पर्धेसाठी स्थान निश्चित केले. या उत्तुंग यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, चिपळूण-संगमेश्वरचे विद्यमान आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, मुख्याध्यापक संदेश राऊत, मार्गदर्शक दीपनंदा बोधे, जीवन गुहागरकर यांनी तिचे अभिनंदन केले. शाल्मलीला विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.