दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाळसुरे यांच्या 14 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने अजिंक्यपद पटकावले. या विजयासह त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेत दापोली तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
गावतळे हायस्कूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत टाळसुरे विद्यालयाच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत आंजर्ले हायस्कूलविरुद्ध चुरशीच्या लढतीत बाजी मारली. अंतिम सामन्यात ए. जी. हायस्कूल, दापोली यांना पराभूत करत त्यांनी अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. 14 वर्षीय गटासह 17 वर्षीय गटातही यश मिळवल्याने टाळसुरे विद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, चिपळूण-संगमेश्वरचे विद्यमान आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, अशोक जाधव, मुख्याध्यापक संदेश राऊत, मार्गदर्शक दीपनंदा बोधे, जीवन गुहागरकर, सुयोग लाले, महेश लाले, संजोग लाले यांनी संघाचे अभिनंदन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दापोली तालुका क्रीडा समन्वयक सत्यवान दळवी, बिपिन मोहिते, अशितोष साळुंखे, संदीप क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले.