दापोली : तालुक्यातील गावतळे येथील फ्रेंड्स सर्कल ग्रुपतर्फे रविवार, ३१ ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी गावतळे गावचे सुपुत्र आणि मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समारंभात पहिली ते चौथी, पाचवी ते बारावी आणि विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
मिलिंद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले, “येथे गुणवत्तेची कमतरता नाही. मुले माइक हातात घ्यायला घाबरतात, पण विवान हा मुलगा माइक सोडायला तयार नाही.
समर्थने निर्भयपणे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सादर केले, तर गीताईने ‘ओंकार स्वरूपा’ गोड गळ्याने गायले आणि सर्वांची प्रशंसा मिळवली.
श्रावणीने डॉक्टर होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. बाळू पवार आणि त्यांच्या तीन बंधूंनी फ्रेंड्स सर्कल ग्रुपच्या नवीन इमारतीसाठी आपली मौल्यवान जमीन दिली, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.”
फ्रेंड्स सर्कल ग्रुपचे सुरेश पवार म्हणाले, “२००७ मध्ये वरचीवाडी येथे स्थापन झालेले हे ग्रुप म्हणजे एक रोपटे होते, जे आता वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. वर्षभर पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी आम्ही कोरोना काळातच नियोजन केले होते.”
अध्यक्षस्थानी असलेले राम पवार म्हणाले, “बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या मागे न लागता आधुनिकतेची कास धरा. कुरुक्षेत्रात श्रीकृष्णाने सांगितलेली गीता फक्त अर्जुनासाठी नव्हे, तर समस्त मानवजातीसाठी आहे.”
यावेळी सचिन पवार आणि निखिल केसरकर यांनी तयार केलेली ग्रुपच्या कारकिर्दीवर आधारित ३० मिनिटांची चित्रफीत आणि व्हिडिओ दाखवण्यात आला. तसेच, राहुल दळवी यांनी तयार केलेली ‘स्वप्न भावाचे’ ही २० मिनिटांची लघुपट दाखवण्यात आली.
समारंभाला विजय पवार, अशोक चव्हाण, राजाराम दळवी, अनंत पवार, सुवर्णा केसरकर, सुभाष पवार, दिलीप दळवी, मुकुंद पवार, शांताराम दळवी, अनिल पवार, विजय दळवी उपस्थित होते.