रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री आणि वितरणाला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खेडशी, गयाळवाडी, रत्नागिरी शहर परिसरातील रेल्वे स्टेशन, कुवारबाव, नाचणे, मारुती मंदिर आणि आठवडा बाजार परिसरात गस्त घालत असताना एका संशयिताला ताब्यात घेतले. 

आठवडा बाजार परिसरातील गाळ्यांमागील मोकळ्या मैदानात अर्धवट बांधलेल्या शेडमध्ये संशयास्पद हालचाली करणारा एक इसम आढळला. त्याच्याकडे असलेल्या सॅकची तपासणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी दोन पंचासमक्ष संशयिताची चौकशी केली असता, त्याने आपले नाव नंदादीप नामदेव वाघदरे, वय 29 वर्षे, रा. मारुती मंदिर जवळ, लांजा जुनी बाजारपेठ, ता. लांजा, जि. रत्नागिरी असे सांगितले. त्याच्या सॅकची झडती घेतली असता, दोन पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक टेपने गुंडाळलेल्या पॅकेटमध्ये 4 किलो वजनाचा हिरवट-काळपट उग्र वासाचा गांजा आढळून आला. यासह इतर मुद्देमालासह एकूण 2,40,100/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

नंदादीप नामदेव वाघदरे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8(क), 20(ब)॥(ब) अंतर्गत गुन्हा क्रमांक 363/2025 नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे. 

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी यशस्वीपणे पार पाडली: 
संदीप ओगले, शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर, अमित कदम, प्रविण खांबे, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, अतुल कांबळे, दत्ता कांबळे.