कर्दे सरपंच आणि पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन तोडणकर यांचा सन्मान

दापोली : भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, दापोली येथील २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच दापोलीतील पेंशनर्स सभागृहात संस्थेचे अध्यक्ष सचिन तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेला संस्थेचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष अमोल नरवणकर, संचालक प्रेमानंद महाकाळ, शशिकांत वराडकर, नितीन मयेकर, अभय गोयथळे, राजेश्वर सुर्वे, जितेंद्र जाधव, केतन वणकर, सुवर्णा मयेकर, ज्योती नागवेकर, व्यवस्थापक पराग भाटकर, कर्मचारी स्वाती बोरकर, अपर्णा महाकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेची सुरुवात सचिन तोडणकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी सभासदांना संबोधित करताना सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून संस्थेला सातत्याने ‘ऑडिट वर्ग-अ’ प्राप्त होत आहे, ज्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगती आणि सभासदांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सचिन तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली असून, सभासदांचे हित जोपासण्यासाठी त्यांचे प्रयत्न अविरत सुरू असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

सभेत व्यवस्थापक पराग भाटकर यांनी गतवर्षीच्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले, ज्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अहवाल, नफा-तोटा पत्रक आणि ताळेबंद यावर सविस्तर चर्चा झाली. सभासदांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचे कौतुक करत संचालक मंडळाचे अभिनंदन केले. यावेळी सचिन तोडणकर यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक झाले.

सभेच्या विशेष आकर्षणांपैकी एक म्हणजे सभासदांच्या पाल्यांचा आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांचा सन्मान. इयत्ता दहावी, बारावी, पदवी आणि इतर विभागांत उच्च यश मिळवणाऱ्या पाल्यांचा तसेच पुरस्कारप्राप्त सभासदांचा गौरव करण्यात आला. यामध्ये प्रेमानंद महाकाळ, जितेंद्र जाधव, बाबू घाडीगांवकर, पराग भाटकर यांचा विशेष सन्मान झाला. याशिवाय, सचिन तोडणकर यांच्या गावाला (कर्दे) केंद्र सरकारच्या कृषी पर्यटन स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर ‘अव्वल कृषी पर्यटन गाव’ म्हणून गौरव प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तोडणकर यांनी या यशाचे श्रेय गावकऱ्यांच्या सहकार्याला आणि पतसंस्थेच्या पाठबळाला दिले.

सभेचे सूत्रसंचालन जितेंद्र जाधव, राजेश्वर सुर्वे, सुवर्णा मयेकर आणि नितीन मयेकर यांनी केले. सभेच्या शेवटी संचालक नितीन मयेकर यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले. राष्ट्रीय गीताने सभेची सांगता झाली.