दापोली: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांचा भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, दापोलीच्या वतीने नुकताच विशेष सन्मान करण्यात आला आहे. दापोली येथील पेंशनर्स सभागृहात झालेल्या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा सन्मान सोहळा पार पडला.

या सभेत संस्थेचे सभासद असलेल्या आणि आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच पुरस्कार प्राप्त सभासदांचा समारंभपूर्वक सन्मान करण्यात आला. बाबू घाडीगांवकर यांनी शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गेल्या आर्थिक वर्षात त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या योगदानाची दखल घेत भंडारी हितवर्धक पतसंस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सन्मान सोहळ्यास पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन तोडणकर, उपाध्यक्ष अमोल नरवणकर, संचालक प्रेमानंद महाकाळ, शशिकांत वराडकर, नितीन मयेकर, अभय गोयथळे, राजेश्वर सुर्वे, जितेंद्र जाधव, केतन वणकर, सुवर्णा मयेकर, ज्योती नागवेकर, व्यवस्थापक पराग भाटकर, लेखापाल स्वाती बोरकर, अपर्णा महाकाळ, नितीन गुहागरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते बाबू घाडीगांवकर यांना सन्मानित करण्यात आले.

बाबू घाडीगांवकर यांच्या सन्मानामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे. त्यांच्या या यशाने कोकणातील साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्राला प्रेरणा मिळाली आहे.