रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील चार नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.
यामध्ये दोन दिग्गज नेत्यांचा समावेश असून, पक्षाच्या नियमांचे उल्लंघन आणि पक्षविरोधी कार्य केल्याच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे.
बडतर्फ करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये वैभव खेडेकर (खेड, रत्नागिरी), अविनाश सौंदळकर (राजापूर, रत्नागिरी), संतोष नलावडे (चिपळूण, रत्नागिरी) आणि सुबोध जाधव (माणगाव, रायगड) यांचा समावेश आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या कारवाईची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मनसे सचिवालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत पत्रकात त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
खेड शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची ताकद उभी करण्यात वैभव खेडेकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या बडतर्फीमुळे पक्षाला कोकणात मोठे राजकीय नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वैभव खेडेकर यांच्या निलंबन पत्रावर चक्क अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

वैभव खेडेकर यांनी खेडसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मनसे पक्ष तळागाळापर्यंत रुजवला आहे. त्यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील मनसैनिक आता कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
आगामी काळात वैभव खेडेकर कोणता राजकीय मार्ग अवलंबणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ही कारवाई मनसेच्या शिस्तीचा भाग असली तरी कोकणातील पक्षाच्या भवितव्यावर त्याचा काय परिणाम होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.