मंडणगड : मंडणगड एस.टी. डेपोमध्ये डिझेल चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील डेपो मॅनेजर मदनीपाशा बहाऊद्दीन जूनेदी (वय 47) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिझेल टँकरच्या चालक आणि क्लीनरने टँकरच्या झाकणात छेडछाड करून डिझेल चोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी मिरज येथून 12,000 लिटर डिझेल भरलेला टँकर (क्रमांक MH-09-CU-7121) मंडणगड एस.टी. डेपोमध्ये दाखल झाला. टँकरचे चालक मोहन शामराव देवकत (वय 40, रा. डोंगरगांव, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि क्लीनर शाहू भिमराव सूर्यवंशी (वय 27, रा. कर्नार रोड, शिवशंभु चौक, ता. मिरज, जि. सांगली) यांनी हा टँकर मिरज येथून आणला होता. दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9:10 वाजता टँकर डेपोमध्ये पोहोचला आणि दुपारी 1:30 वाजेपर्यंत टँकरमधील डिझेल जमिनीखालील टाकीत टाकण्यात आले.
टँकरमधील डिझेल टाकीत टाकल्यानंतर मोजमाप केले असता 61 लिटर डिझेल कमी आढळले, ज्याची किंमत 5,425.27 रुपये (प्रति लिटर 88.93 रुपये) आहे. यानंतर डेपो मॅनेजर, लेखपाल इटकर, हेड मॅकेनिक विठोबा चौधरी आणि इंधन लिपीक भूसारे यांनी टँकरच्या झाकणाची तपासणी केली. तपासणीत असे आढळले की, चालकाने झाकणात छेडछाड करून एक खास व्हॉल्व्ह बसवला होता. हा व्हॉल्व्ह चालू केल्यावर डिझेल टँकरच्या तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये छुप्या कुप्याद्वारे जात होते. यामुळे चालक आणि क्लीनर डिझेल चोरी करत असल्याची खात्री डेपो व्यवस्थापनाला झाली.
मदनीपाशा जूनेदी यांनी याबाबत मंडणगड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, चालक मोहन शामराव देवकत आणि क्लीनर शाहू भिमराव सूर्यवंशी यांनी संगनमताने डिझेल चोरी केली. तक्रारीनुसार, चोरीस गेलेल्या डिझेलची एकूण किंमत 5,425.27 रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, लवकरच याबाबत पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.