दापोली : संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली येथे ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत वेशभूषा, संवाद सादरीकरण आणि देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदीप दापोलीचे सेक्रेटरी श्री. सुजय मेहता यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून झाली. त्यानंतर शिक्षकांनी देशभक्तीपर गीत सादर केले.
वेशभूषा स्पर्धेत इयत्ता नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे रूप धारण करून त्यांच्या कार्याची झलक प्रभावीपणे सादर केली.
संवाद सादरीकरण स्पर्धेत क्रांतिकारकांचे विचार, ऐतिहासिक घटना आणि स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान यांचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चित्रण केले. तसेच, इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत सुरेल गायनातून देशप्रेमाचा संदेश दिला.
सुजय मेहता यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ होऊन त्यांना इतिहासाची प्रेरणादायी ओळख मिळते.
कार्यक्रमाच्या समारोपात विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चंदाली पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.