दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इळणे येथे कार्यरत असलेले आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेले उपक्रमशील शिक्षक जीवन सुर्वे यांनी नुकतेच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली.
त्यांच्या ३८ वर्षांच्या अखंड शिक्षकीय सेवेचा आणि सामाजिक तसेच संघटनात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी दापोली येथील नवभारत छात्रालय सभागृहात एका भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात त्यांना निरामय दीर्घायुष्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या दापोली तालुका शाखा आणि रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने हा सेवापूर्तीपर सदिच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी राज्यनेते संभाजीराव थोरात, राज्य कार्याध्यक्ष संतोष कदम, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे, जिल्हा सचिव संतोष रावणंग, जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र रणसे, कैलास शार्दुल, पतपेढी संचालक चंद्रकांत झगडे, माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, चारुता कामतेकर, निलेश शेठ, राजेंद्र फणसे, जिल्हा शिक्षक नेते विकास नलावडे, दापोली तालुकाध्यक्ष संदीप जालगांवकर, तालुका सचिव गणेश तांबिटकर, शिक्षक नेते अविनाश मोरे, महिला आघाडी अध्यक्ष नम्रता चिंचघरकर, अश्विनी मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी जीवन सुर्वे यांच्या शिक्षकीय कारकीर्दीतील योगदान, त्यांचे संघटनात्मक कार्य आणि सामाजिक क्षेत्रातील सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
त्यांनी शिक्षक म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात रुजवलेल्या मूल्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या समारोपात संघटनेच्या वतीने जीवन सुर्वे यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यासाठी दापोली तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो शिक्षक, हितचिंतक आणि नातेवाईक उपस्थित होते.