दापोली : दापोली पंचायत समिती आणि व्हिजन दापोली समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथील सोहनी विद्यामंदिर सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात चंद्रनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी आरोही महेश मुलुख हिचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, नगराध्यक्ष कृपा घाग, गट शिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई, निलेश शेठ, सुधीर कालेकर, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, दापोली तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आरोही मुलुख हिने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवत आणि नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पात्र ठरत विशेष यश संपादन केले.
याशिवाय, रत्नागिरी जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या नासा-इस्रो भेट स्पर्धा परीक्षेत ती इस्रो भेटीसाठी पात्र ठरली. तिचा गौरव म्हणून गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते गौरवपदक, उपयुक्त पुस्तके आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
याच शाळेतील आणखी एक विद्यार्थीनी नीरजा मनोज वेदक हिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल तिचाही या समारंभात विशेष सन्मान करण्यात आला. चंद्रनगर शाळेतील या दोन्ही विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.