रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ईलेक्ट्रॉनिक्स सिगारेट प्रतिबंध (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठा आणि जाहिरात) कायदा २०१९ च्या कलम ७ आणि ८ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये कायद्याने बंदी असलेल्या ई-सिगारेट (व्हेप) चे सेवन आणि शाळेच्या दप्तरात बाळगण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या.

या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून शोधमोहीम हाती घेतली होती. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही कारवाई आता तीव्र करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आज, दि. ०४/०८/२०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे रत्नागिरी शहरातील तेली आळी नाका येथील जय गगनगिरी जनरल स्टोअरवर छापा टाकण्यात आला.

या कारवाईत दुकानमालक गोविंद दिनेश गजरा (वय ४१, रा. तेली आळी नाका, रत्नागिरी) याच्याकडून १,७२,५०० रुपये किंमतीच्या ६९ ई-सिगारेट (व्हेप) जप्त करण्यात आल्या.

या मालावर कायद्याने बंदी असून, पंचनामा करून तो जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

कारवाईत सहभागी झालेल्या पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सपोफौ दिपक साळवी (७०८), पोहवा अमोल भोसले (१३९९), पोहवा आशिष भालेकर (१११२), पोहवा पंकज पडेलकर (१४४७), पोहवा प्रशांत पाटील (१०७१) आणि पोकॉ अमित पालवे (४८४) यांचा समावेश होता.

रत्नागिरी जिल्ह्यात शाळा आणि कॉलेज परिसरात तंबाखूजन्य पदार्थ, बिडी, सिगारेट यांच्या विक्रीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

तसेच, शालेय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांचा पुरवठा व वितरण कायदा २००३ (COTPA) अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिक आणि शालेय शिक्षकांना आवाहन करण्यात येत आहे की, शालेय परिसरात अशा प्रकारची उत्पादने विक्री किंवा सेवन होत असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती द्यावी.