रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या बहुप्रतिक्षित विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या वतीने केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसायाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या भव्य समारंभात मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री ना. नितेश राणे आणि उद्योग, मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे आणि खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच, विधानपरिषद सदस्य आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, चिपळूणचे आमदार शेखर निकम, गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव आणि लांजा-राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सचिव डॉ. रामास्वामी एन., रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक यांनी सर्वांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मिरकरवाडा बंदर हे रत्नागिरीतील एक महत्त्वाचे बंदर असूनही, अनधिकृत बांधकामांमुळे त्याचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता.
मात्र, ना. नितेश राणे यांच्या पुढाकाराने २७ जानेवारी २०२५ रोजी या बंदरावरील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली, ज्यामुळे विकासाचा मार्ग मोकळा झाला.
१९८६ मध्ये मिरकरवाडा बंदर बांधून पूर्ण झाले होते, परंतु त्यानंतर अनधिकृत बांधकामांमुळे प्रगती खुंटली होती. २०१३ मध्ये दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन झाले होते, तरीही अनेक कामे अपूर्ण राहिली होती.
आता ना. नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे ही कामे पूर्णत्वास जाणार असून, रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसायाला नवे बळ मिळणार आहे. या विकासामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि राज्य तसेच देशाच्या उत्पन्नात वाढ होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.
