दापोली – तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, मौजे दापोली येथे समारंभपूर्वक पार पडली.
दापोली कन्या शाळेतील विषय शिक्षिका विद्या मुरुडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेच्या व्यासपीठावर गिम्हावणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड, मौजे दापोली शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा गौरी चरकरे तसेच गिम्हवणे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

मौजे दापोली शाळेचे मुख्याध्यापक भरत गिम्हवणेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी परिषदेचे प्रास्ताविक सादर करताना नवीन अभ्यासक्रम आणि पायाभूत जीवनकौशल्य विकास या विषयावर सविस्तर विवेचन केले.
सोहनी शाळेतील शिक्षक मुकेश बामणे यांनी इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमाची शिक्षकांना सविस्तर माहिती दिली.
मासिक पाळी व्यवस्थापन या संवेदनशील विषयावर आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी ऐश्वर्या धनेश्वर यांनी विद्यार्थिनींसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.
चंद्रनगर शाळेतील विषय शिक्षिका मानसी सावंत यांनी केंद्रीय संसाधन गट या विषयावर सविस्तर माहिती दिली.
केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी विविध प्रशासकीय विषयांवर माहिती देत आढावा घेतला.
दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी प्रशासकीय कामे आणि योजनांबाबत मार्गदर्शन केले.
नुकतेच सेवानिवृत्त झालेले शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे यांचा गिम्हवणे केंद्रातर्फे सन्मान करत त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या परिषदेत चंद्रनगर शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मुंबईतील कोकणदीप संस्थेचा शिक्षणरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
तसेच, मौजे दापोली शाळेतील शिक्षक महेश कोकरे यांचा मुलगा मनीष महेश कोकरे याने नीट परीक्षेत यश मिळवून एम.बी.बी.एस.साठी प्रवेश मिळविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सन्मान करण्यात आले.
परिषदेचे सूत्रसंचालन महेश कोकरे यांनी केले, तर नरेंद्र जाधव यांनी आभार मानले.