रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी रत्नागिरी येथील झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट देऊन चालू असलेल्या संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

भेटीच्या सुरुवातीला केंद्राचे नव-नियुक्त वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे स्वागत केले.

कुलगुरूंनी झाडगाव येथील तलावांची पाहणी करून मत्स्य संवर्धन आणि त्यादरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी तलावांमध्ये बोयर माशांचे बिज सोडून त्यांचे संवर्धन करण्याचे सूचित केले.

तसेच, मत्स्य संवर्धन प्रयोगशाळेत चालू असलेले शोभिवंत माशांचे बिजोत्पादन, शैवाळ बिज बँक, अक्वॉपोनिक प्रकल्प आणि पाणी वनस्पती संवर्धन यासारख्या विविध कामांची पाहणी केली.



कुलगुरूंनी विद्यापीठ परिभ्रमण निधी अंतर्गत चालू असलेल्या ‘मत्स्यालय व संग्रहालय प्रदर्शन’ आणि ‘तलावातील नौकाविहार’ प्रकल्पांबाबत समाधान व्यक्त केले.

तसेच, रत्नागिरीतील पेठकिल्ला येथील संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबतही चर्चा झाली. भविष्यातील शेतकरी-केंद्रित कार्यासाठी त्यांनी विविध सूचना केल्या.



यावेळी डॉ. आसिफ पागरकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक), डॉ. हरीश धमगये (अभिरक्षक व प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), व्ही. आर. सदावर्ते, अपुर्वा सावंत (वरिष्ठ संशोधन सहाय्यक), सचिन पावसकर (लिपिक), दिनेश कुबल (बोटमन), प्रा. एम. टी. शारंगधर (सहयोगी प्राध्यापक) आणि डॉ. वैभव येवले (विषय तज्ञ) उपस्थित होते. यावेळी डॉ. आसिफ पागरकर यांनी आभार प्रदर्शन केले.