दापोलली : राज्य सरकारने हिंदी सक्ती कायदा रद्द केल्याने दापोलीत मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आघाडीतील घटक पक्षांनी सहभाग घेतला. तसेच, दापोली तालुक्यातील अनेक मराठी बांधवांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. दि. ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून दापोली शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी सांगितले की, सरकारने लादलेला हिंदी सक्ती कायदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकजुटीपुढे टिकू शकला नाही, त्यामुळे तो रद्द करण्यात आला. तसेच, दापोली तालुक्यात वाढत असलेली परप्रांतीयांची मुजोरी भविष्यात मोडून काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी उद्धव ठाकरे पक्षाचे दापोली शहरप्रमुख संदीप चव्हाण, उपशहरप्रमुख विक्रांत गवळी, माजी नगराध्यक्ष ममता मोरे, मनसे तालुकाध्यक्ष नितीन साठे, शरद पवार गटाचे दापोली तालुका अध्यक्ष सचिन तोडणकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश मोरे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.