दापोली : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा दापोलीच्या वतीने 6 ऑगस्ट 2025 रोजी दापोली तालुक्यातील नवोदित आणि प्रस्थापित कवींसाठी ‘श्रावणधारा’ काव्योत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे यांनी ही माहिती दिली.
नुकतीच दापोली येथे कोमसापच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत वर्षभरातील साहित्यिक कार्यक्रम आणि उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.
सभेला चेतन राणे यांच्यासह मुश्ताक खान, बाबू घाडीगांवकर, कुणाल मंडलीक, कैलास गांधी, संदीप यादव, शमशाद खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दापोली तालुक्यातील नवोदित आणि महाविद्यालयीन कवींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा काव्योत्सव आयोजित करण्यात येत आहे.
हा कार्यक्रम 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता दापोली येथील दापोली अर्बन बँक सायन्स कॉलेजच्या सभागृहात होणार आहे.
काव्योत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व कवींचा कोमसाप दापोलीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या काव्योत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी आपल्या कवितेचा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ कुणाल मंडलीक (9028466701) किंवा चेतन राणे (9527364032) यांच्या व्हाट्सॲप क्रमांकावर 25 जुलै 2025 पर्यंत पाठवावा, असे आवाहन कोमसाप दापोलीच्या वतीने करण्यात येत आहे.