दापोली: बुरोंडी गावचे सुपुत्र डॉ. अनिल सावळाराम पावसे यांची कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी येथे अधिष्ठाता (Dean) म्हणून नेमणूक झाली आहे.
दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या बुरोंडी गावातील मच्छीमार कोळी समाजातील हे आदर्श व्यक्तिमत्त्व लहानपणापासून अभ्यासाची आवड आणि उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विराजमान होण्याचे स्वप्न घेऊन पुढे गेले.
त्यांच्या वडिलांचा, दिवंगत सावळाराम पावसे यांचा, भारतीय सैन्यदलातील कर्तृत्वाचा वारसा आणि आईने लावलेली अभ्यासाची गोडी यामुळे डॉ. अनिल पावसे यांनी आज हे यश संपादन केले आहे.
कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी या देशातील अग्रगण्य संस्थेत मच्छीमार कोळी समाजातील व्यक्तीने अशा उच्च पदावर नेमणूक मिळवणे हे समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
डॉ. अनिल पावसे यांच्या या यशामुळे बुरोंडी गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण दापोली तालुक्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.