दापोली, २२ जून २०२५ : जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, दापोली परिसरात गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांतून फुललेल्या दुर्मीळ कोकण दीपकाडी (Dipcadi) या वनस्पतीच्या संरक्षणासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, त्यांनी या मोहिमेला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

कोकणात केवळ २५ ठिकाणी आढळणारी ही वनस्पती मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आली आहे. तिचा नैसर्गिक अधिवास असलेल्या कातळी सड्यांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. या मोहिमेअंतर्गत ‘Wild Animal Rescue and Research’ ही संस्था आणि वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अमित मिरगळ सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी “Dipcadi: From Extinction to Expansion” या संवर्धन मोहिमेची आखणी केली आहे.

या वनस्पतीचे दापोलीतील कातळी सड्यांवर पुनर्स्थापन करून तिचे संवर्धन आणि पुनरुत्पादन केले जाणार आहे. यासाठी स्थानिक समुदायाचा सहभाग महत्त्वाचा असून, लवकरच जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. काही स्थानिक नागरिकांनी आधीच आपली जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. जागा उपलब्ध करू इच्छिणाऱ्या इतरांनीही पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या चर्चेत दापोली वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. “लोकसहभागाशिवाय जैवविविधतेचे संवर्धन शक्य नाही,” या भावनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.

संपर्कासाठी:
– डॉ. अमित मिरगळ: ९५४५५ ५५२३४
– मिलिंद गोरीवले: ९७६४४५४४५४
– तुषार महाडिक: ७४९९०६८८१०
– मनीत बाईत: ९१९०७५२२६८८३
– सतीश दिवेकर: ९३०७६७४६३२