दापोली: दापोली तालुक्यातील उंबर्ले येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून तहसील कार्यालय दापोलीने सन २०२५-२६ या महसूल वर्षात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या शासनाच्या धोरणांतर्गत दाभोळ मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान आयोजित केले.

या अभियानांतर्गत तहसीलदार अर्चना बोम्बे, मंडळ अधिकारी बी.एस.राठोड आणि सरपंच नरेंद्र मांडवकर यांच्या हस्ते लाभार्थींना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा, उंबर्ले येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून झाली. सरपंच नरेंद्र मांडवकर यांनी तहसीलदार अर्चना बोम्बे, मंडळ अधिकारी बी.एस.राठोड आणि सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी तहसीलदार अर्चना बोम्बे यांनी दाभोळ मंडळातील लाभार्थींना विविध दाखल्यांची माहिती देताना त्यांचे महत्त्व आणि विशेषत: ऍग्रिस्टेक दाखल्याचे फायदे समजावून सांगितले. तसेच, या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सरपंच नरेंद्र मांडवकर यांचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाला ग्राम महसूल अधिकारी प्रमोद बोरसे, अंजली कांबळे, श्रद्धा बंडे, साफिया मुलाणी, पोलीस पाटील संतोष नाचरे, ओळगावचे पोलीस पाटील नरेश मांजरेकर, निगडे पोलीस पाटील योगिनी येसवारे, गव्हे पोलीस पाटील संदीप लिंगावळे, नानटे पोलीस पाटील निलेश तांबे, सेतू प्रतिनिधी ओमकार कात्रे, कोतवाल संतोष कदम, कृषी सहाय्यक, उंबर्ले आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच दाभोळ मंडळातील सर्व गावांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पोलीस पाटील आणि दापोली तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन राणे यांनी केले, प्रास्ताविक ग्राम महसूल अधिकारी प्रमोद बोरसे यांनी केले, तर आभार सरपंच नरेंद्र मांडवकर यांनी मानले.