रत्नागिरी : जागतिक स्तरावर ‘अत्यंत धोक्यात’ (क्रिटीकली एंडेंजर्ड) म्हणून नोंद असलेल्या ‘तणमोर’ (लेसर फ्लोरिकन) पक्ष्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील एका पठारावर सोमवारी, २६ मे रोजी दर्शन झाले.
रत्नागिरीचे पक्षी निरीक्षक ॲड. प्रसाद गोखले यांनी हा दुर्मिळ पक्षी पाहिला आणि त्याचे छायाचित्र घेतले. या महत्त्वपूर्ण घटनेमुळे रत्नागिरीच्या पठारी भागाच्या संवर्धनाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
जगभरात केवळ ३०० ते ७०० नर तणमोर पक्षी अस्तित्वात असून, भारतात हा पक्षी स्थानिक आहे. रत्नागिरीच्या पठारावर मादी तणमोराची नोंद झाल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे.
ॲड. गोखले हे नेहमीप्रमाणे पक्षीनिरीक्षणासाठी गेले असताना त्यांना ही मादी तणमोर अन्न शोधताना दिसली. ‘कॉर्बेट फाउंडेशन’चे संचालक केदार गोरे यांनी सांगितले की, तणमोर पक्षी प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रजनन करतात आणि पावसाळ्यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात स्थलांतर करतात. सध्या परतीच्या प्रवासादरम्यान खराब हवामानामुळे ही मादी रत्नागिरीत भरकटलेली किंवा विश्रांतीसाठी थांबलेली असावी.
तणमोर पक्ष्यांच्या अधिवासासाठी आवश्यक गवताळ प्रदेशांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे. याशिवाय, वीजवाहक तारांमुळेही या पक्ष्यांना धोका आहे, कारण स्थलांतरादरम्यान रात्रीच्या प्रवासात ते तारांमध्ये अडकून मृत्युमुखी पडतात. ‘दी कॉर्बेट फाउंडेशन’ने गुजरात वन विभागाच्या सहकार्याने उपग्रह टॅगिंग केलेल्या ‘एलएफएम-९’ नर तणमोर पक्ष्याची पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, शिरूर, हवेली, पुरंदर आणि बारामती तालुक्यांमधील गवताळ प्रदेशात नोंद झाली आहे. यापूर्वी १८८०, १९०७, १९०८, १९१३ आणि १९३८ मध्ये कोकणातील अलिबाग, पनवेल, चिपळूण तालुक्यांमधून तणमोर पक्ष्याची नोंद झाली होती.
तणमोर हा साधारण ४५ सेंमी उंचीचा, कोंबडीएवढा छोटा पक्षी आहे. नर आणि मादी मातकट रंगाचे असून त्यांच्यावर तुटक काळ्या रेषा असतात. विणीच्या हंगामात नराच्या डोक्यामागे तुरा येतो आणि त्याच्या पाठीमागून पिंगट काळा, पोटाकडे काळा आणि मानेवर तसेच पंखांमध्ये पांढरा रंग दिसतो. या पक्ष्याचे शेपूट आखूड असते. पावसाळी हंगामात विणीचा काळ असतो, तेव्हा नर मादीला आकर्षित करण्यासाठी चार फुटांच्या उड्या मारतो. हा पक्षी जमिनीवर घरटे बांधतो आणि त्यात दोन ते चार अंडी घालतो. गवताळ माळराने आणि कोरडवाहू शेतीसारख्या अधिवासांमध्ये हा अत्यंत सावध आणि लाजाळू पक्षी आढळतो.