दापोली : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (MCA) दापोली तालुक्यातील वाघवे येथील रॉयल गोल्डफिल्ड संकुलात विभागीय क्रिकेट अकादमी सुरू करणार आहे. राज्यातील गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी MCA चे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
रॉयल गोल्डफिल्ड येथे आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले, “दापोलीतील रॉयल गोल्डफिल्ड संकुलात क्रिकेट अकादमीसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. संकुलाचे मालक अनिल छाजेड यांनी क्रिकेटप्रेमापोटी कमी बजेटमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे उत्तम खेळपट्टी, खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था, स्विमिंग पूल आणि जीम आहे. भविष्यात इनडोअर स्टेडियम आणि बॅटिंग-बॉलिंग पीच उपलब्ध होणार आहेत.”

या अकादमीद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल. पवार पुढे म्हणाले, “दापोलीत भविष्यात MCA चे सामने खेळवण्याचा मानस आहे. BCCI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार तीन खेळपट्ट्या उपलब्ध झाल्यास रणजी आणि अन्य फॉरमॅटचे सामने येथे होऊ शकतील.” यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दापोलीतील कृषी विद्यापीठ मैदान आणि आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन स्थानिक पातळीवर समन्वय साधणार आहे. MCA च्या वतीने क्रिकेटच्या प्रसारासाठी आणि मुलभूत सोयीसुविधांसाठी प्रत्येक जिल्ह्याला ७५ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. दापोलीतील ही अकादमी स्थानिक क्रिकेटपटूंना मोठी संधी देणार आहे.