दापोली: तालुक्यातील हर्णे बायपास रोडजवळील समुद्रकिनारी असलेल्या दगडात मंगळवारी (दि. ६) दुपारी ५ ते ६ किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थ आढळून आला. दापोली पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून हा पदार्थ ताब्यात घेतला आहे. हा पदार्थ व्हेल माशाची उलटी आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी तो नागपूर येथील वनविभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हर्णे येथील सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांनी निसर्ग हॉटेलसमोरील समुद्रकिनारी दगडात व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी ही माहिती पत्राद्वारे वनविभागाला कळवली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, उपनिरीक्षक राजकुमार यादव, परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील आणि त्यांचे सहकारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास हर्णे समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले. त्यांना हा पदार्थ दगडात अडकलेल्या अवस्थेत आढळला. पदार्थाला मोठ्या प्रमाणात वाळू लागलेली होती. त्यामुळे तो धुवून पंचनामा करण्यात आला आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला.
वनविभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले की, हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याबाबत साशंकता आहे. याची खात्री करण्यासाठी हा पदार्थ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जाणार आहे.