रत्नागिरी, दि. ०६ मे २०२५: जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विभाग, रत्नागिरी आणि जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तंत्रज्ञान विस्तार सहाय्य व कृषी विकास परिषद २०२५ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा शनिवार, दि. १० मे २०२५ रोजी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत महिला बचतगटांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धकांना ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा, हक्की यांसारख्या पौष्टिक तृणधान्यांचा वापर करून चविष्ट, आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थ सादर करण्याची संधी आहे. पदार्थांचे मूल्यमापन चव, पौष्टिकता, सादरीकरण आणि नाविन्यता या निकषांवर आधारित अनुभवी परीक्षकांकडून केले जाणार आहे.

स्पर्धेसाठी प्रथम ५० स्पर्धकांची निवड करण्यात येईल आणि स्पर्धास्थळी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. उत्कृष्ट पदार्थ सादर करणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेचे अंतिम निकाल आयोजक आणि परीक्षकांकडून राखीव ठेवले जातील.

या स्पर्धेच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्यांचा वापर आणि त्यांचे महत्त्व याबाबत जागरूकता वाढवण्याचा आयोजकांचा मानस आहे. अधिक माहितीसाठी श्रीमती हर्षा पाटील (९४२२४४४५७१) आणि श्रीम. गौरी मोरे (८८०६६४८८७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.