दापोली : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने आज सर्व मंडल अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर केल्या. यामध्ये रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील सात मंडल अध्यक्षांचाही समावेश आहे.
दापोली तालुक्यात प्रथमच दोन स्वतंत्र मंडळे स्थापन करण्यात आली असून, दापोली शहर आणि दापोली ग्रामीण अशी त्यांची नावे आहेत. दापोली शहर मंडल अध्यक्षपदी दापोली नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका तसेच आरोग्य व स्वच्छता सभापती जया साळवी यांची, तर दापोली ग्रामीण मंडल अध्यक्षपदी सचिन होडबे यांची निवड झाली आहे.

भाजपाच्या बुथ अध्यक्षांपासून राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंतच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने पार पडतात. बुथ अध्यक्ष निवडीनंतर आता तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत दापोली ग्रामीणसाठी जया साळवी आणि दापोली शहरासाठी खेड येथील जिल्हा उपाध्यक्ष नागेश धाडवे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी सरचिटणीस श्रीराम इदाते, तालुका सरचिटणीस भालचंद्र कोकणे, विवेक भावे, महिला मोर्चा अध्यक्षा मधुरा खोत, शहराध्यक्षा वैष्णवी वेल्हाळ, शहराध्यक्ष संदीप केळकर, जिल्हा चिटणीस मकरंद म्हादलेकर, विनोद लयाळ, धिरज पटेल, दिपक महाजन, स्वरूप महाजन, अमोल चोरगे, अमोल तांबे, पांडुरंग पावसे, शैलेश कालेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.