रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन आणि साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावाला ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
यानुसार, मालगुंड येथील ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रम आणि कोकणातील साहित्यिकांची माहिती देणाऱ्या ‘कोकण साहित्य सन्मान दालन’ यांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा रविवार, 20 एप्रिल 2025 रोजी मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या साहित्यिक उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी केले.
नमिता कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 2017 पासून महाराष्ट्र शासनाने वाचन संस्कृती वृद्धीसाठी ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रम सुरू केला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांच्या जन्मगावाला ही मान्यता मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
“मालगुंड हे साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान असलेले गाव आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी मालगुंडला आधुनिक कवितेची राजधानी आणि कवी केशवसुत स्मारकाला साहित्याची पंढरी संबोधले होते,” असे त्या म्हणाल्या. मराठी भाषा व उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.
या उपक्रमामुळे पर्यटकांना वाचनाचा लाभ, पर्यटनाला चालना आणि स्थानिक अर्थार्जनाला गती मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. “मालगुंड येथे हा उपक्रम होत असल्याने आम्हाला अभिमान आहे. हा सोहळा रत्नागिरी जिल्हावासीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे,” असे सांगत त्यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांनी सांगितले, “पुस्तकाचे गाव हा स्तुत्य उपक्रम आहे. मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम पूर्णत्वास जात आहे. महाराष्ट्र शासन सकारात्मक पावले उचलत असताना सर्वांनी सहभागी होणे ही आपली जबाबदारी आहे.”
या पत्रकार परिषदेला नमिता कीर, रमेश कीर, कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील आणि कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरीचे अध्यक्ष प्रा. आनंद शेलार उपस्थित होते.