दापोली – दापोली नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे खालीद रखांगे आज शिवसेना नेते रामदास कदम यांच्या भेटीला पोहोचले.
त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याबाबतचे तपशील आमच्यापर्यंत जरी पोहोचू शकले नसले तरी भविष्यात खालील रखांगे शिवसेना शिंदे गटात दाखल होऊ शकतात अशा चर्चा दापोली शहरात आणि परिसरात रंगू लागल्या आहेत.

खालीद रखांगे यांनी आपल्या समर्थकांसह भेट घेतली असल्याने नजीकच्या काळात दापोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहावयास मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आता खालीद रखांगे यांच्यासह कोण नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुळचे शिवसैनिक असलेल्या खालीद रखांगे यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राजकीय जीवनाला सुरूवात केली.

त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट पकडली व राष्ट्रवादीतून ते नगरसेवकही झाले.
त्यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती.
त्यानंतर माजी आमदार संजय कदम यांचे समर्थक अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. संजय कदम यांच्या प्रेमापोटी त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता.

मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दापोली मतदारसंघामध्ये फार मोठया प्रमाणात बदल होऊ लागले आहेत.
राज्यमंत्री म्हणून ना. योगेश कदम यांचा शपथविधी झाल्यावर दापोली मतदारसंघात अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात जाऊ लागले असल्याचे चित्र तयार झाले होते.
त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले व त्यानंतर शिवसेना युबीटीमध्ये प्रवेश केलेले पाच नगरसेवकांनी राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या वाढदिवसादिवशी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी लवकरच शिवसेनेचा भगवा नगरपंचायतीवर फडकेल असा विश्वास ना. योगेश कदम यांनी व्यक्त केला होता.
त्यानंतर काही दिवसातच उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांनी आपले समर्थक अजिम चिपळूणकर, फिरोज गिलगिले, स्वीकृत नगरसेवक नादीर रखांगे, नगरसेविका रिया सावंत यांच्यासह शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेतली व विस्तृतपणे चर्चाही केली.
त्यानंतर या सर्वांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान नगराध्यक्ष ममता मोरे, नगरसेवक रविंद्र क्षीरसागर, नगरसेवक आरिफ मेमन हे नेमकी काय भूमिका घेणार हे समजू शकले नाही.
तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी कोण पदाधिकारी खालीद रखांगे यांच्यासमवेत शिवसेनेत जाणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.