मुंबईत गेल्या काही दिवसांत रोज तीन हजाराहून अधिक करोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे मुंबई महापालिकेने आगामी दहा दिवसांत करोना रुग्णांसाठी २० हजार खाटांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला असून लक्षण नसलेल्या तथापि निरीक्षणासाठी दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांसाठी ५० हजार खाटांची लवकरच व्यवस्था केली जाईल, असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. यासाठी खाजगी रुग्णालयांकडून ८०टक्के प्रमाणे ४८०० खाटा ताब्यात घेतल्या जाणार आहेत. करोना वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन महापालिकेने पायाभूत आरोग्य सुविधा उभारणे, लसीकरणाचा वेग वाढवणे व करोना रुग्णांवरील उपचारासाठी जास्तीतजास्त खाटांची व्यवस्था निर्माण करण्याला प्राधान्य दिले आहे. या त्रिसुत्रीनुसार आम्ही खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा पुन्हा ताब्यात घेणार आहोत. सध्या खासगी रुग्णालयातील ३००० खाटा पालिकेच्या ताब्यात असून येत्या काही दिवसांत त्या गेल्या वेळेप्रमाणे म्हणजे ४८०० खाटा पालिकेच्या ताब्यात आलेल्या असतील असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींसमवेत आयुक्त इक्बालसिंग चहल यांची एक बैठक झाली असून रोजच्या रोज खाटांची आवश्यकता, औषधे व अन्य सामग्रीचा आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयांच्या मिळून सध्या १३,०८४ खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी आजच्या दिवशी ५१४४ खाटा या रिक्त आहेत. अतिदक्षता विभागात १५२९ खाटा उपलब्ध असून त्यापैकी ४९१ खाटा आजही रिकाम्या आहेत. यामागे सध्या आढळणाऱ्या करोना रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण हे लक्षण नसलेले असून सध्या लक्षण असलेले ४० टक्केच करोना रुग्ण दाखल असल्याचे सुरेश काकाणी म्हणाले. रुग्णालयात पुरेशा खाटा वाढविण्याबरोबर रेमडेसिवीरसह सर्व अत्यावश्यक औषध साठा तसेच उपकरणे उपलब्ध करण्यात आली असून एकीकडे करोना रुग्ण शोधण्यासाठी चाचण्या वाढवणे, रुग्ण संपर्कातील लोकांचा शोध घेणे तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याला प्राधान्य देण्यात आला आहे. सध्या मुंबईत १०० लसीकरण केंद्रे असून रोज जवळपास पन्नास हजार लसीकरण केले जाते. लवकरच १२५ लसीकरण केंद्र सुरु करण्यात येतील रोज ७५ हजार लोकांना लस दिली जाईल. रोज एक लाख लोकांना लस देण्याचा आमचा निर्धार असून त्यादृष्टीने तयारी सुरु असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबईकरांनीही त्यांची जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. मास्क घालणे, गर्दी न करणे, आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडणे, सानीटाइझेशन आदींची काटेकोर काळजी घ्यायला हवी. महापालिकेने मास्क न घालणार्यांवर व्यापक कारवाई सुरु केली असली तरीही लोकांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक असल्याचे अतिरिक्त आयुक्त म्हणाले.