दापोली: दापोलीतील अवघ्या ११ वर्षांच्या साईश रोहन तलाठी याने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाईवर यशस्वी चढाई करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पुणे येथील ‘भवताल’ संस्थेतर्फे आयोजित भंडारदरा समर ॲडव्हेंचर कॅम्पमध्ये त्याने हा पराक्रम गाजवला.
७ मे २०२६ रोजी आयोजित या साहसी कॅम्पमध्ये ट्रेकिंग, रॅपलिंग, रॉक क्लाइंबिंग आणि सांधण व्हॅली ट्रेक अशा विविध आव्हानात्मक उपक्रमांचा समावेश होता.
साईशने अत्यंत आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर या सर्व उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला. चार दिवसांच्या या शिबिरात त्याने शारीरिक क्षमता आणि मानसिक ताकदीचे उत्तम प्रदर्शन केले.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इतर साधनांपासून दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात साहसी वृत्ती जोपासण्याचा अनोखा अनुभव त्याला या माध्यमातून मिळाला.
इतक्या लहान वयात कठीण मानले जाणारे कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल साईश तलाठीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्याच्या धाडसाचे विशेष कौतुक केले जात आहे.
साईशच्या या यशाबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

