दापोली: दापोली तालुक्यातील चिखलगाव गणेशवाडी येथे नवतरुण मित्र मंडळ व उत्कर्ष महिला मंडळ यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा महिला मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांनी त्यांना त्यांची पत्नी आणि त्यांचा एकत्रित फोटो असलेली प्रेमभेट दिली. या भेटीने योगेश कदम भारावून गेले.
ही भेट स्वीकारताना योगेश कदम भावूक झाले आणि त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना एक वैयक्तिक गोष्ट शेअर केली.
“माझ्या घरी सुद्धा माझा आणि माझ्या पत्नीचा एकत्रित फोटो नाही,” असे विधान त्यांनी यावेळी केले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ भावनिक वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी वाडीतील महिलांनी दाखवलेल्या या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.
चिखलगाव गणेशवाडी येथे ९ आणि १० मे रोजी हा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. दोन दिवसांच्या या सोहळ्यात ओम आदिनाथ वारकरी संप्रदायाचा हरिपाठ व कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
मंडळाच्या वतीने गावातील माहेरवाशिणींचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी अनेक महिलांना गहिवरून आले. यासोबतच ज्येष्ठ नागरिक, देणगीदार आणि हितचिंतकांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत उजाळ होते, त्यांनी मंडळाच्या वतीने योगेश कदम यांना विधान भवनाची प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी भगवान घाडगे, उन्मेष राजे, चंद्रकांत बैकर, रोहिणी दळवी, साधना महाजन, सुनील दळवी, मनीष पांढरे, प्रदीप राणे, दीपक घडसे, दिनेश आडविलकर, जाधव, रमेश भुवड, रामाने यांसह शिवसेना आणि मुंबई मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण व मुंबई मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

