दापोली : तालुक्यातील उटंबर येथील हजरत पीर बाबा याकुब सरवरी दर्ग्याच्या ६५३ एकर इनामी जमिनीवरील अतिक्रमण हटवून महसूल अभिलेखातील ७/१२ उताऱ्यावर हजरत पीर बाबा याकुब सरवरी दर्गा यांचे नाव भोगवटादार म्हणून नोंदवावे, या प्रमुख मागणीसाठी याकुब बाबा दर्गा विश्वस्त कमिटीच्या वतीने शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ पासून दापोली तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

या जमिनीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने यावर कारवाई करावी, अशी मागणी कमिटीकडून करण्यात आली आहे.

विश्वस्त कमिटीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांनी याकुब बाबा यांना आपले गुरु मानले होते. दर्गा व दर्गा परिसराची देखभाल, दिवाबत्ती, उद, फुले तसेच भाविकांच्या सेवेसाठी महाराजांनी ६५३ एकर जमीन याकुब बाबा दर्ग्याला इनाम म्हणून दिल्याचा दावा कमिटीने केला आहे.

या इनामी जमिनीबाबत ब्रिटिशकालीन कागदपत्रे, पुरातत्व खाते पुणे, रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाकडे इनाम जमिनीचे ताम्रपत्र, इनाम कमिशनरची सनद तसेच सन १८९३ मधील लँड एलिनेशन रजिस्टरमधील नोंद उपलब्ध असल्याचे कमिटीचे म्हणणे आहे. तसेच फेरफार नोंदी आणि ७/१२ उताऱ्यावरही इनाम प्रकाराची नोंद असल्याचा दावा कमिटीकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार संबंधित जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे अधिकार महसूल अधिकाऱ्यांना असल्याने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून अतिक्रमणे हटवावीत आणि ऐतिहासिक वारसा जपावा, अशी विश्वस्त कमिटीची भूमिका आहे.

या मागण्यांसाठी १५ ऑगस्टपासून तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले जाणार असल्याने महसूल विभाग यावर कोणती भूमिका घेतो, याकडे दापोलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. कमिटीने केलेले ऐतिहासिक, महसुली आणि कायदेशीर दावे हे त्यांच्या निवेदनावर आधारित असून, संबंधित कागदपत्रांच्या प्रशासकीय पडताळणीनंतरच पुढील कायदेशीर स्थिती स्पष्ट होणार आहे.