दापोली: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दापोलीतील ओम साईराम मित्र मंडळ (दापोलीचा राजा) वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी वन विभागाचे कर्मचारी, वनरक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच साईराम मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्वतः वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना वृक्षलागवडीचे महत्त्व, जंगलांचे संवर्धन, हवामान बदलाचे वाढते संकट आणि भावी पिढ्यांसाठी हिरवागार पर्यावरण निर्माण करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
साईराम मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून पर्यावरण संवर्धनासाठी हा वृक्षारोपण उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यात अशा पर्यावरणपूरक उपक्रमांना अधिकाधिक सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईराम मित्र मंडळाचे कार्यकर्ते, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे दापोली परिसर अधिक हिरवागार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

