चिपळूण: वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने निसर्गप्रेम आणि जनजागृतीचा संदेश देण्यासाठी उपविभागीय वनविभाग आणि रेडिओ कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हास्तरीय ‘वन्यजीव पशूपक्षी काव्यस्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा तीन स्वतंत्र गटांमध्ये घेतली जाणार असून, यामध्ये गट अ मध्ये ७ वी ते ९ वीचे विद्यार्थी, गट ब मध्ये १० वी ते १२ वीचे विद्यार्थी आणि गट क मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला गट समाविष्ट करण्यात आला आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी मराठी, कोकणी किंवा बाणकोटी भाषेत ८ ते २० ओळींची स्वतः रचलेली कविता सादर करणे बंधनकारक आहे.
प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच स्वरचित कविता पाठवता येणार असून, कविता पाठवण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील दोन्ही विद्यार्थी गटांसाठी प्रथम क्रमांकास २ हजार रुपये आणि सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकास १ हजार रुपये आणि सन्मानपत्र, तर तृतीय क्रमांकास ५०० रुपये आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे. याशिवाय दोन प्रोत्साहनपर बक्षीसांमध्ये प्रत्येकी २५० रुपये व सन्मानपत्र आणि पाच उत्तेजनार्थ स्पर्धकांना रोपांची भेट व सन्मानपत्र प्रदान केले जाईल.
खुल्या गटातील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकास ३ हजार रुपये आणि सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये आणि सन्मानपत्र, तृतीय क्रमांकास १ हजार रुपये आणि सन्मानपत्र, दोन प्रोत्साहनपर बक्षीसांमध्ये प्रत्येकी ५०० रुपये व सन्मानपत्र आणि पाच उत्तेजनार्थ विजेत्यांना रोपांची भेट व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
इच्छुकांनी आपल्या कविता प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन स्वरूपात अंतिम मुदतीपूर्वी सादर कराव्यात, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

