रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगरपरिषद, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स आणि एम. एम. बी. यांच्या संयुक्त विद्यमाने भाट्ये समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून प्लास्टिक प्रदूषण संपवण्यासाठी पर्यावरणाला हातभार लावावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

समुद्र किनाऱ्याची स्वच्छता मोहिमेदरम्यान भाट्ये येथे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, पंचायत समिती सदस्य अर्चना साळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी उमेश गावखडकर आणि उपमुख्याधिकारी मयूर बेहरे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

समुद्र, नदी व जलस्त्रोतांच्या ठिकाणी वाढणारे प्लास्टिक प्रदूषण रोखणे आणि त्यांची स्वच्छता राखणे ही आपली सर्वांची सामायिक जबाबदारी असून स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून व घरापासून करावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून एकल प्लॉस्टिकचा वापर न करणे, प्लॉस्टिक पिशव्या हटवणे आणि समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करणे या संदेशाचा प्रसार करण्यासाठी कापडी पिशव्यांचे प्रकाशन आणि वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ या उपक्रमांतर्गत महासागर, तट आणि सागरी परिसंस्थेचे रक्षण व संवर्धन करण्याची सामूहिक शपथ घेतली.

समुद्र तट व जलनिकाय स्वच्छ ठेवणे, सिंगल-यूझ प्लॉस्टिकच्या वापरातून कचरा न पसरवणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत उपस्थितांना प्रतिज्ञा दिली गेली.