रत्नागिरी : येथे कबड्डी महर्षी दिवंगत शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिवसानिमित्त, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आणि रत्नागिरी जिल्हा व तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने २६ वा कबड्डी दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानासाठी ज्येष्ठ क्रीडा कार्यकर्ते सदानंद त्रिंबक जोशी यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी सदानंद जोशी यांनी गेली ५० वर्षे अथक परिश्रम घेतले आहेत. झुंजार युवक मंडळाच्या माध्यमातून १९७५ पासून त्यांनी कबड्डी खेळाची धुरा वाहिली आहे.
रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनमध्ये त्यांनी सहकार्यवाह म्हणून १९९५ ते २००८ आणि खजिनदार म्हणून तब्बल १६ वर्षे म्हणजे २००८ ते २०२४ या काळात जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सुमारे ५०० कबड्डी संघ असोसिएशनशी संलग्न करून घेतले, ज्यासाठी अनेकदा त्यांनी स्वतःच्या खिशातून शुल्क भरले.
तसेच, असोसिएशनच्या माध्यमातून सुमारे २८ लाख रुपयांचा निधी कायम ठेव म्हणून जमा करण्यात मोलाचा वाटा उचलला. केवळ कबड्डीच नव्हे, तर कुस्ती, मल्लखांब, शरीर सौष्ठव, जलतरण आणि सायकलिंग अशा विविध क्रीडा प्रकारांत त्यांनी खेळाडू, पंच आणि पदाधिकारी म्हणून भरीव कार्य केले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा क्रीडा परिषद यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये त्यांनी विविध पदे भूषवली आहेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सदानंद जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आपल्यासारख्या एका सामान्य क्रीडा कार्यकर्त्याची दखल घेऊन या मानाच्या कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा व तालुका कबड्डी असोसिएशनचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

