रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव, सतर्कता, सामाजिक जबाबदारी, कायद्याबद्दल आदर, स्वसंरक्षणाची क्षमता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ या विद्यार्थी-केंद्रित जनजागृती अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून तसेच अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व उपविभागांतील पोलीस अधिकारी व अंमलदार आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.

या मोहिमेदरम्यान विशेष सादरीकरणे, प्रात्यक्षिके, चर्चासत्रे आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध सामाजिक, तांत्रिक व कायदेशीर विषयांवर जागरुक केले जाईल.

यामध्ये सायबर फसवणुकीचे प्रकार, त्यावरील उपाय, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, डिजिटल गोपनीयता आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

तसेच अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि जिल्हा पोलिसांच्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अमली पदार्थविरोधी मोहिमेची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.

वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, अल्पवयीनांनी वाहन चालवण्याचे धोके यावरही प्रकाश टाकला जाईल.

याशिवाय बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षणासाठी गुड टच आणि बॅड टच यातील फरक, आपत्कालीन परिस्थितीत स्वसंरक्षणाचे मूलभूत तंत्र, मुलींच्या सुरक्षेसाठीचे उपाय आणि आत्मविश्वास वाढवण्याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले जाईल.

त्याचप्रमाणे पोलीस दल व शासकीय सेवांमधील करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात असून सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा