रायगड: मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजीजवळ शनिवारी दुपारी आणखी एक भीषण अपघात घडला.

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने दापोलीकडे जाणाऱ्या एकाच कुटुंबातील आई आणि मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

अनिल रावसाहेब मरकड हे आपल्या परिवारासह कारने (एमएच ०८ एएन २४३९) महाडकडून दापोलीच्या दिशेने जात होते. त्यांची कार पोलादपूरनजीक आली असता, रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर (एमएच ०४ एलवाय १६३८) मागून वेगात आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत अनिल मरकड यांच्या पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल मरकड आणि त्यांचा मुलगा चिन्मय हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कार कंटेनरखाली एवढी अडकली होती की जेसीबीच्या सहाय्याने तिला बाहेर काढावे लागले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना आणि मृतदेहांना बाहेर काढले.

जखमींना सुरुवातीला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असलेले अनिल मरकड यांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे, तर चिन्मयला महाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलादपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.