दापोली: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दापोली तालुक्यात पंचायत समितीच्या वतीने ‘प्लास्टिक मुक्त महा स्वच्छता श्रमदान’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
जलशक्ती मंत्रालय, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची अंमलबजावणी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ‘दापोली तालुका स्वच्छ व सुंदर करणे’ या अभियानांतर्गत २ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत दापोली शहरापासून गिम्हवणे, जालगाव, टाळसूरे, खेर्डी, लाडघर आणि मौजेदापोली या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या सुमारे पाच किलोमीटर परिसराची स्वच्छता केली जाणार आहे.
संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ दापोली बसस्थानक येथे सकाळी ६.४५ वाजता होणार आहे.

या मोहिमेत पंचायत समितीचे सर्व शासकीय कर्मचारी, सामाजिक संस्था, संत निरंकारी मंडळ, महिला मंडळे, बचत गट, युवक मंडळे, छोटे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक तसेच जेसीआय, लायन्स क्लब आणि रोटरी क्लब सहभागी होणार आहेत.
जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती उन्मेष रामचंद्र राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि दापोलीचे गटविकास अधिकारी यांनी केले आहे.


