दापोली: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी जाहीर केलेल्या संचमान्यतेच्या नवीन निर्णयामुळे कोकणातील ग्रामीण शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे.
या अन्यायकारक निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरणार असून अनेक शाळा ‘शिक्षकविहीन’ होण्याच्या मार्गावर आहेत.
या निर्णयाचा निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
नव्या अटींमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ९७ शाळांवर गदा येणार असून त्यातील ६० शाळा पूर्णतः शून्य शिक्षकी होणार आहेत. विशेषतः दापोली तालुक्यातील ४ माध्यमिक शाळांमध्ये एकही शिक्षक उरणार नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात २६७ माध्यमिक शिक्षक आणि १५० शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरले असून त्यांच्या समायोजनाची धास्ती निर्माण झाली आहे.
दुर्गम भागात ५ किलोमीटरच्या परिसरात अन्य शाळा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची, विशेषतः विद्यार्थिनींची गळती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
स्वातंत्र्यानंतर कष्टाने उभारलेल्या ग्रामीण शिक्षण संस्था मोडीत काढण्याचा हा डाव असल्याचा आरोप ऋषिकेश गुजर यांनी केला आहे.
जुन्या पद्धतीनुसार तुकडीवर आधारित संचमान्यता कायम ठेवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून, शासनाने निर्णय मागे न घेतल्यास कोकणातील शाळा वाचवण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

