रत्नागिरी : शहरातील ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट हेरंब लक्ष्मण पटवर्धन यांचे ११ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या सनदी लेखापाल क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
हेरंब पटवर्धन यांनी १९७२ मध्ये पहिल्याच प्रयत्नात सी.ए. परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या जन्मभूमी रत्नागिरीत व्यावसायिक कार्यालयाची स्थापना केली होती.
त्यानंतर पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आयकर व अंकेक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि समर्पित वृत्तीने सेवा बजावली. कर चुकवेगिरी न करता आपले खरे उत्पन्न जाहीर करून प्रामाणिकपणे कर भरावा, या तत्त्वाशी त्यांनी आयुष्यभर कधीही तडजोड केली नाही.
आपल्या सचोटीपूर्ण कार्यातून त्यांनी असंख्य अशिलांचा विश्वास संपादन करत व्यावसायिक नैतिकतेचा एक मोठा आदर्श निर्माण केला.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४० विद्यार्थ्यांनी सी.ए. ही प्रतिष्ठित पदवी संपादन केली असून, अनेक नवोदित चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या व्यावसायिक जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले.
ज्ञानदान आणि भावी पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सी.ए. क्षेत्रात नेहमी लक्षात राहील.
हेरंब पटवर्धन यांची अंत्ययात्रा १२ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून काढण्यात येणार असून, रत्नागिरीतील चर्मालय स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाने सचोटी, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिक मूल्ये जपणाऱ्या एका आदर्श व्यक्तिमत्त्वाला समाज मुकला आहे.

