दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पंचनदी येथील मुख्याध्यापिका सविता सुकुमार मडिवाळ यांची शासनाच्या वतीने ‘आयडॉल शिक्षिका’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या आणि कायम नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या सविता मडिवाळ या इंग्रजी विषयामध्ये विशेष निपुण आहेत.

त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानामुळेच शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना या सन्मानासाठी निवडले आहे.

नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या आणि शाळेत विविध अभिनव उपक्रम राबवणाऱ्या या हरहुन्नरी शिक्षिकेच्या निवडीमुळे दापोली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, शिक्षक वृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व स्तरातून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.