संगमेश्वर : तालुक्यातील नायरी येथे सुनेच्या कथित मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ९१ वर्षीय जलेखा इसाक मोडक यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ज्या वयात आधाराची गरज असते, त्याच वयात लाकडी दांडक्याचे घाव सहन करत या वृद्धेने जगाचा निरोप घेतल्याने परिसरातून संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
नायरी येथील राहत्या घरी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी हा प्रकार घडला होता. सतत घरात बसून सासूची देखभाल करावी लागते आणि कुठेही बाहेर फिरायला जाता येत नाही, या कारणावरून संशयित आरोपी सुनेने स्वतःच्या ९१ वर्षांच्या सासूवर लाकडी दांडक्याने आणि हाताबुक्क्यांनी हल्ला केला होता.
या मारहाणीत जलेखा मोडक यांच्या दोन्ही पायांना, गुडघ्याला आणि हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी वृद्धेच्या कन्येने पनवेल पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित आरोपी सुनेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या शारीरिक आणि मानसिक आघातातून जलेखा मोडक सावरू शकल्या नाहीत आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी नायरी येथे आणण्यात येत असून, आता शवविच्छेदन अहवालात काय निष्पन्न होते आणि पोलीस या प्रकरणात कोणती कठोर कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

