खेड – शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार संजय कदम यांचे स्वीय सहाय्यक सुनील चव्हाण यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे उबाठा गटासह माजी आमदार संजय कदम यांना हा मोठा धक्का मानला जातोय.

सुनील चव्हाण हे दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या सोबत सातत्याने कार्यरत होते.

ते आमदारकीच्या काळात त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांचे कामकाज सांभाळत होते. संपूर्ण दापोली मतदार संघात ते कायम पाठराखण करत.

एक विश्वासू सहकारी म्हणून ते सोबत होते. संजय कदम हे दापोलीतून पराभूत झाल्यानंतरही ते दोघे एकत्र दिसत.

त्यानंतर हळूहळू दोघेही विभक्त झाले. त्यावेळी सुनील चव्हाण हे नाराज दिसत असताना अचानक त्यांनी माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची मुंबई पालखी निवासस्थानी भेट घेत थेट शिंदे गटात पक्षप्रवेश केला.

त्यांना विद्यमान आमदार योगेश कदम यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. चव्हाण हे मतदारसंघाचा अनुभव आणि ग्रामीण भागातील विरोधी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची ओळख असलेल्यांपैकी आहेत.

ते शिंदे गटाच्या हाताला लागल्याने विरोधकांची ताकद थोडी कमी होवून माजी आमदार संजय कदम यांना या पक्षप्रवेशामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुनील चव्हाण यांच्या सारखा जवळचा कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात जातो, हे उबाठा गटाला शल्य असून सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत.