दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, शिवाजीनगर-भौंजाळी हिने आपल्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या जोरावर सन २०२४-२५ चा रत्नागिरी जिल्हा परिषद ‘आदर्श शाळा पुरस्कार’ पटकावला आहे.
हा मानाचा पुरस्कार १३ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शाळेने मागील वर्षभरात शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विविध शैक्षणिक व क्रीडा उपक्रम, स्पर्धा परीक्षा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शाळेची रंगरंगोटी, पटसंख्या वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमांमुळे हा बहुमान मिळवला आहे.
याशिवाय पंचायत समिती दापोलीच्या ‘व्हिजन दापोली’ उपक्रमांतर्गत सर्व उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करून शाळेने आदर्श कामगिरीची नोंद केली आहे.
शाळेच्या या यशामागे गावच्या सरपंच सुवर्णा अबगुल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवप्रताप राणे, शिक्षणतज्ज्ञ सचिन सावंत, गणेश रेवाळे, समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे, सदस्य सुवर्णा खळे, जिल्हा परिषद सदस्य ऐश्वर्या धाडवे, गटविकास अधिकारी मंडलिक, गटशिक्षणाधिकारी सांगडे आणि केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांच्या मार्गदर्शनाचा शाळेच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा आहे.
मुख्याध्यापक विश्वास भोपे आणि उपशिक्षिका सरिता हजारे यांच्या नेतृत्वाखाली शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल संपूर्ण दापोली तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

