रत्नागिरी : महाराष्ट्राची समृद्ध संतपरंपरा आणि भक्ती चळवळीचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीत यंदा रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या उपक्रमांतर्गत आणि मैलोनमैल पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन फिजिओथेरपी पदवी अभ्यासक्रमाचे २५ हून अधिक विद्यार्थी कोल्हापूर येथे या वारीत सामील झाले.

यामध्ये सानिका जाधव, कशिश उपाध्याय, पृथ्वीराज चौहान, अनुष्का बिराजदार, वरद बल्लाळ, सलोनी पाटील, सांजली टकले, नेत्रा औसरमल, श्रेया पोसनाक यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचा समावेश होता.

वारीमध्ये सतत चालण्यामुळे थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना या विद्यार्थ्यांनी मसाज केला आणि त्यांना आवश्यक ती फिजिओथेरपी ट्रीटमेंट देऊन आराम दिला.

विद्यार्थ्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे व कौशल्याचे सर्वच वारकरी मंडळींनी विशेष कौतुक केले. या वारीत सहभागी झालेले विद्यार्थी विविध भाषा आणि पंथांचे प्रतिनिधित्व करत होते, परंतु वारीच्या वातावरणात ते पूर्णपणे एकरूप झाले.

प्रेमाचा, समतेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या वारीतील हा सहभाग नवनिर्माण संस्थेच्या सामाजिक आणि शैक्षणिक वाटचालीला अधिक समृद्ध करणारा ठरला.

सध्या महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील विद्यार्थी एस. एम. जोशी फिजिओथेरपी महाविद्यालयात शिक्षण घेत असून, शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच सामाजिक जाणिवांचे भान आणि सेवाभावाची शिकवण देणारा हा वारीतील सहभाग विद्यार्थ्यांसाठी एक विशेष व अविस्मरणीय अनुभव ठरला आहे.